दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – नेहरू नगर येथे राहणाऱ्या आणि पाथरी ग्रामपंचायतीत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सपना सुदर्शन पाटील (वय ३९) यांचा दहा लाख रुपयांसाठी सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सपना पाटील यांचे सासरचे लोकांनी लग्नात अपेक्षित मानपान न दिल्याचा राग मनात ठेवत वेळोवेळी मारहाण केली, तसेच त्यांचा पगार बळजबरीने घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांच्या माहेरच्यांकडून पतीच्या व्यवसायासाठी दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला.
हा त्रास ६ जानेवारी २०२४ पासून ९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत सुरू होता. अखेर हा छळ असह्य झाल्याने सपना पाटील माहेरी परत गेल्या व त्यांनी ८ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून संबंधित सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रामदास कुंभार करीत आहेत.