जळगाव जिल्हा पोलिस दलात १६ अत्याधुनिक गाड्यांची भर; दोन कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि पोलिसांच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात लवकरच १६ नवीन अत्याधुनिक गाड्या दाखल होणार आहेत. यामध्ये १५ महिंद्रा स्कॉर्पिओ आणि १ महिंद्रा ७०० या वाहनांचा समावेश असून, यासाठी राज्य शासनाकडून २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या नव्या वाहनांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, आपत्कालीन घटनांना वेगाने प्रतिसाद देणे तसेच ग्रामीण भागात गस्त वाढवणे अधिक सुलभ होणार आहे. वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग, वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम यांसारखी अत्याधुनिक तांत्रिक साधने असणार असून, पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांचा पुढाकार
या वाहनांची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी राज्य शासनाकडे सादर केली होती. त्यांच्या पुढाकारातून ही मागणी मान्य झाली असून, लवकरच ही वाहने जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिस सेवेत रुजू होतील.
गावागावांतील सुरक्षेसाठी मजबूत पाऊल
नवीन गाड्यांच्या मदतीने पोलिसांची उपस्थिती ग्रामीण भागातही अधिक ठोस होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृढ राखणेसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.