मध्यप्रदेशातून गावठी कट्टे विक्रीस आणणाऱ्या दोघांना अटक 

मध्यप्रदेशातून गावठी कट्टे विक्रीस आणणाऱ्या दोघांना अटक 

एलसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन मध्यप्रदेशातील संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत दोन गावठी कट्टे, दोन दुचाकी आणि दोन मोबाईलसह एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई

दि. ८ जून २०२५ रोजी सहायक फौजदार रवी नरवाडे आणि पोलीस हवालदार गोपाळ गव्हाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम मध्यप्रदेशातील भगवानपूरा तालुक्यातील सीरवेल येथून अवैधरित्या गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले.

सिनेस्टाईल पाठलाग आणि अटकेची थरारक घटना

सदर पथकाने रावेर तालुक्यातील पाल येथील जंगल परिसरात सापळा रचला. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन इसम काळ्या रंगाच्या टीव्हीएस दुचाकींवर जंगल परिसरात येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना यशस्वीरित्या ताब्यात घेतले.

अवैध हत्यारे व इतर मुद्देमाल जप्त

अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय ४५) – रा. सीरवेल महादेव, ता. भगवानपूरा, जि. खरगोन (म.प्र.)निसानसिंग जिवनसिंग बरनाला (वय २३) – रा. उमटी, ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. रा. सीरवेल महादेव, ता. भगवानपूरा (म.प्र.)

त्यांच्याकडून २ गावठी कट्टे, २ दुचाकी (TVS Raider व TVS Sport), २ मोबाईल फोन असा एकूण अंदाजे १,७०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, रावेर पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. २५४/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करत आहेत.