१३ वर्षीय मुलाचा निर्घुण खून ;नरबळीचा संशय

एरंडोल (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरा बसला आहे. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय तेजस गजानन महाजन या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. या घटनेने गावात शोक आणि भीती पसरली आहे. हत्येमागे नरबळीचा संशय असून, पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.दुकान बंद केल्यानंतर बेपत्ता; रात्रभर शोध
तेजस आपल्या आई-वडील आणि बहिणीसह रिंगणगावात राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेती आणि कृषी केंद्र चालवतात. सोमवारी (१६ जून) तेजसला दुकानावर ठेवून वडील जळगावला गेले होते. संध्याकाळी दुकान बंद करून तो घरी येईल, अशी अपेक्षा होती; पण रात्री उशिरापर्यंत तो घरी पोहोचला नाही. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी रात्रभर शोधाशोध केली. याबाबत एरंडोल पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.खर्ची शिवारात आढळला मृतदेह
मंगळवारी पहाटे खर्ची गावालगत निंबाळकरांच्या शेतात तेजसचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या पथकाने फॉरेन्सिक तज्ज्ञांसह घटनास्थळी तपास केला. मृतदेह तेजसचाच असल्याचे समजताच गावात हळहळ व्यक्त झाली.नरबळीचा संशय; तिघांवर पोलिसांची नजर
पोलिसांना या हत्येमागे अंधश्रद्धेतून नरबळीची शक्यता वाटत आहे. तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हत्येचे कारण आणि सूत्रधार कोण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.जिल्ह्यात खळबळ आणि भीती
या क्रूर हत्येने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन सखोल तपास करत असून, लवकरच या प्रकरणातील सत्य समोर येईल, अशी आशा आहे.