महाराष्ट्रात वीज दरात ऐतिहासिक कपात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ; घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना होणार थेट लाभ

महाराष्ट्रात वीज दरात ऐतिहासिक कपात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ; घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना होणार थेट लाभ

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) दिलेल्या निर्णयानुसार राज्यात वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात केली जाणार असून, ही कपात इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर MERC ने निर्णय देत पहिल्या वर्षी 10 टक्के, आणि पुढील पाच वर्षांत एकूण 26 टक्क्यांपर्यंत वीज दर कपात जाहीर केली आहे. आम्ही MERC चे आभारी आहोत.”

या निर्णयाचा लाभ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना होणार आहे. राज्यातील 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण सुमारे 70 टक्के आहे, आणि या ग्राहकवर्गाला सर्वाधिक फायदा होणार आहे.

फडणवीस यांनी सांगितले की, “आमच्या बळीराजाला दिवसा व खात्रीशीर वीजपुरवठा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ युद्धपातळीवर सुरू आहे. हरित ऊर्जा खरेदी वाढवली जात असल्यामुळे वीजखरेदीचा खर्चही कमी होईल आणि त्याचा थेट फायदा दरकपातीला होतो आहे.”

ही कपात राज्यातील सर्वच वर्गातील ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.