कजगाव परिसरात एकाच रात्री चार घरफोड्या; रोकड व सोन्याचे दागिने लांबवले

प्रतिनिधी | कजगाव, ता. भडगाव
कजगाव, घुसर्डी आणि पासर्डी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरांमध्ये चोरी करून मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. २६ जूनच्या मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सर्वप्रथम कजगाव येथील राणा पॉइंट चौकात असलेल्या सुदर्शन भिला अमृतकर यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी घरातून मोठ्या प्रमाणावर रोकड चोरून नेली.
यानंतर चोरटे पुढे पासर्डी गावातील भारत नगर येथे गेले. तेथे अर्जुन विठ्ठल पाटील यांच्या घरातून सुमारे २०,००० रुपयांची रोकड चोरी केली. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या घुसर्डी गावात, बळीराम हरी जाधव आणि निवृत्ती भास्कर देवकर यांच्या घरांची तोडफोड करत चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने असा ऐवज लांबवला.
या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, पोलिस प्रशासनावर टीका होत आहे. याआधीही परिसरात मोटरसायकल चोरी व घरफोड्यांचे प्रकार घडले असून, अजूनही त्याचा तपास लागलेला नाही.
खतासाठी ठेवलेली रोकड चोरीला; शेतकरी हवालदिल
या घरफोड्यांमध्ये काही घरांमधून शेतीसाठी व खत-मजुरीसाठी ठेवलेली रोकड चोरीला गेली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मजुरी व खते खरेदीसाठी त्यांनी जमवलेले पैसे चोरीला गेल्यामुळे, आता शेतीची कामे कशी पार पाडावीत, याची चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे.
या चारही घरफोड्यांनी भडगाव पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक घटनांचा तपास अपूर्ण असताना, पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.