रावेरात तीन ठिकाणी चोरटयांनी दुकाने फोडली ; हजारोंचा ऐवज लंपास
रावेर (प्रतिनिधी) – रावेर शहराच्या मध्यवर्ती महात्मा गांधी चौक परिसरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार दुकानांवर चोरी केल्याने शहरात खळबळ उडाली असून चोरटयांनी हजारोंचा ऐवज लंपास केला आहे, या चोर्त्यांमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पहिली घटना महेंद्र ताराचंद्र लोहार यांच्या ‘न्यू मनोज जनरल स्टोअर्स’मध्ये घडली. दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व काही वस्तू लंपास केल्या. दुसऱ्या घटनेत शेख सादिक यांच्या ‘युनिक किराणा स्टोअर’चे शटर वाकवून आतील साहित्य चोरून नेण्यात आले. तिसऱ्या घटनेत भूषण कोळी यांच्या ‘महादेव मेडिकल’चे कुलूप तोडून औषधांचा साठा चोरून नेण्यात आला. चौथ्या घटनेत शरीफभाई पन्नीवाले यांच्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले असले तरी कोणतीही चोरी झाली नाही.
या चोरीच्या घटनांची माहिती सकाळी उघड होताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही स्थानिकांनी सांगितले की, रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान शहरात वाळू तस्कर मोटरसायकलवरून फिरताना दिसतात. त्यामुळे अशा वेळी अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्यांना वाळू तस्कर समजून दुर्लक्ष केले जाते. चोरट्यांनी याच गोंधळाचा फायदा घेत चोरी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या घटनेनंतर शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवण्याची, तसेच वाळू तस्करांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांनी या सर्व घटनांची नोंद घेत तपास सुरू केला असून चोरट्यांचा लवकरच छडा लावण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.