न्हावी येथे दोन ठिकाणी घरफोडी; सुमारे १२ लाखांचा ऐवज लंपास

न्हावी (ता. यावल) | प्रतिनिधी
न्हावी येथील चावदस नगर आणि सदाशिव नगर या दोन वसाहतींमध्ये २५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या घरफोडीत सुमारे १२ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल अरुण चौधरी यांच्या घरात चोरी झाली असून, चोरट्यांनी कुंपणाच्या गेटवरून आत प्रवेश करत घराचे कुलूप तोडले. घरातील कपाट आणि कॉटमधील सामान अस्ताव्यस्त फेकून, सुमारे २५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीच्या वेळी घरात कोणीच नसल्याने चोरट्यांनी हा प्रकार आरामात केला. सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला.
सदाशिव नगर परिसरातील नारायण कडू नेमाडे यांच्या घरात रात्री २.५१ वाजता तीन चोरट्यांनी प्रवेश केला. घरातून ९.५ तोळे सोने (अंदाजे किंमत ९.५० लाख रुपये) आणि १.६५ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
चोरीची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय रामेश्वर मोताळे व सय्यद यांनी तपास सुरू केला आहे. सकाळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही चोरी प्रकरणांचा बारकाईने तपास सुरू आहे.