भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक ; जळगावचा तरुण ठार तर  दोघे गंभीर जखमी

भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक ; जळगावचा तरुण ठार तर  दोघे गंभीर जखमी

बामणोद ते पाडळसा रस्त्यावरील घटना

भुसावळ, २९ जून २०२५ – रावेरकडून भुसावळकडे येणाऱ्या मार्गावर बामणोद ते पाडळसा दरम्यान आज रविवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता भरधाव एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील मयूर अण्णा गवळी (रा. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे साथीदार गंभीर जखमी झाले आहेत.

दुचाकी वळणावरून जात असताना समोरून धडक
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर अण्णा गवळी यांचे जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाजवळ महाबासुंदी  नावाचे चहा विक्री दुकान असून मयूर अण्णा गवळी हे आपल्या मित्र जयेश पाटील आणि गोयर यांच्यासोबत दुचाकीवरून बामणोद येथे गेले होते.

काम आटोपून परत येताना वळणावर त्यांच्या दुचाकीला एसटी बसने जोरदार धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की मयूर यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला

जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार
अपघातात गंभीर जखमी झालेल्या जयेश पाटील आणि गोयर यांना तातडीने भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मयूरच्या निधनाने  जळगाव शहरात शोककळा
मयूर गवळी हे जळगावमध्ये महाबासुंदी चहा विक्रेते म्हणून ओळखले जात होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू, हसतमुख आणि मदतीला तत्पर असा होता. त्यामुळे त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच अनेक मित्र, नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी व तीन बहिणी असा परिवार आहे. मयूरच्या अकाली निधनाने संपूर्ण जळगावात शोककळा पसरली आहे.