निंबादेवी धरणात अंघोळ करताना जळगाव शहरातील१८ वर्षीय तरुण बुडाला; एकाचा थोडक्यात जीव वाचला

प्रतिनिधी | यावल
रविवारची सुट्टी जळगावच्या तरुणांच्या आनंदावर पाणी फेरून गेली. यावल तालुक्यातील सावखेडासिम जवळ असलेल्या निंबादेवी धरणात अंघोळीसाठी गेलेल्या आठ तरुणांपैकी जळगाव शहरातील १८ वर्षीय तरुण खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाला. दुसऱ्या एका तरुणाचा मात्र थोडक्यात जीव वाचवण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीमधील आठ तरुण सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी निंबादेवी धरणावर गेले होते. अंघोळ करताना जतीन अतुल वार्डे (वय १८) हा खोल पाण्यात गेला आणि बुडाला. त्याच्यासोबत आणखी एक तरुण देखील बुडू लागला होता. मात्र, इतर तरुणांनी तत्काळ मानवी साखळी तयार करून त्याला केसांना धरून बाहेर ओढून वाचवले.
घटनेची माहिती पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलिसांना दिल्यानंतर सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी आणि संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून, सोमवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धरण परिसरात जाण्यास मनाई – पोलिसांचा इशारा
सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धरण परिसरात पाण्याची पातळी कधीही वाढू शकते. तसेच त्या भागातील रस्त्यांची अवस्था वाईट असून अपघाताचा धोका अधिक आहे. नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे.