सरकारी बँकांमध्ये मोठी भरती; ५० हजार जागा उपलब्ध

नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये चालू आर्थिक वर्षात जवळपास ५० हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. बँकांच्या विस्तार आणि वाढत्या व्यवसायिक गरजांसाठी ही भरती केली जाणार असून, यामध्ये सुमारे २१ हजार अधिकारी आणि उर्वरित लिपिक व इतर पदांचा समावेश आहे.
सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या वर्षात सुमारे २० हजार नवीन कर्मचाऱ्यांना संधी देणार आहे. यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि कनिष्ठ सहयोगी पदांसह विशेषज्ञ अधिकारी देखील असतील. सध्या एसबीआयने ५०५ प्रोबेशनरी ऑफिसर आणि १३,४५५ कनिष्ठ सहयोगी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती देशभरातील ३५ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशात करण्यात येणार आहे.
मार्च २०२५ पर्यंत एसबीआयमधील एकूण कर्मचारी संख्या २.३६ लाखांवर पोहोचेल, तर अधिकारी वर्गाची संख्या १.१५ लाखांपेक्षा जास्त आहे. एका कर्मचाऱ्याच्या सरासरी भरती खर्चाचा अंदाज सुमारे ४० हजार रुपये आहे.
दुसऱ्या क्रमांकाची पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) सुमारे ५,५०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. मार्च २०२५ पर्यंत पीएनबीमध्ये एकूण कर्मचारी संख्या १.०२ लाखांवर पोहोचेल. तसेच, सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील यावर्षी सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
सरकारी बँकांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.