मुंबई : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ५४० रुपयांची घसरण झाली असून, तो ९८ हजार २९० रुपयांवर आला आहे. जीएसटीसह सोनं खरेदी करताना १ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे. शनिवारी याच २४ कॅरेट सोन्याचा दर ९८ हजार ८३० रुपये होता. त्यामुळे आज १० तोळा २४ कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी ९ लाख ८२ हजार ९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत, जे शनिवारीच्या तुलनेत ५,४०० रुपयांनी कमी आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील प्रतितोळा ५०० रुपयांची घट झाली असून, तो आज ९० हजार १०० रुपये आहे. १० तोळ्यांचे दर ९ लाख १ हजार रुपये झाले आहेत. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ४१० रुपयांची घट होऊन तो ७३ हजार ७२० रुपयांवर पोहोचला आहे. १८ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी आज ७ लाख ३७ हजार २०० रुपये मोजावे लागतील.
दरम्यान, सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज चांदीचा दर प्रतिग्रॅम ११० रुपये आहे, तर १ किलो चांदीसाठी १ लाख १० हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे नागरिकांचा कल चांदीपेक्षा सोनं खरेदी करण्याकडे अधिक असण्याची शक्यता या क्षेत्रातील ततज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.