सीए अंतिम परीक्षेत संभाजीनगरच्या राजन काबरा याची देशात प्रथम क्रमांकाने बाजी

पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनी मे २०२५ मध्ये घेतलेल्या सीए फाऊंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम परीक्षांचे निकाल रविवारी (दि. ६) जाहीर केले. या परीक्षांमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी देशपातळीवर यश मिळवत राज्याचा गौरव वाढवला आहे.
अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरच्या राजन काबरा याने ६०० पैकी ५१६ गुण मिळवत (८६ टक्के) देशात प्रथम क्रमांक पटकावला. इंटरमीडिएट परीक्षेत मुंबईच्या दिशा गोखरू हिने ५१३ गुण (८५.५० टक्के) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, तर गाझियाबादच्या वृंदा अग्रवाल हिने फाऊंडेशन परीक्षेत ४०० पैकी ३६२ गुण (९०.५ टक्के) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
अंतिम परीक्षेत कोलकात्याची निश्था बोथरा हिने ५०३ गुण (८३.८३ टक्के) मिळवत दुसरा क्रमांक, तर मुंबईच्या मानव शहा याने ४९३ गुण (८२.१७ टक्के) मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.
देशभरातील ५५१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. अंतिम परीक्षेच्या निकालानुसार ग्रुप १ मधून १४,९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी २२.३८ टक्के आहे. ग्रुप २ मधून १२,२०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी २६.४३ टक्के इतकी आहे.