राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; कोकण, विदर्भात ऑरेंज अलर्ट

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; कोकण, विदर्भात ऑरेंज अलर्ट

पुणे – राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून रविवारी विविध भागांमध्ये पावसाची संततधार अनुभवली गेली. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात पावसास अनुकूल हवामान निर्माण झाले असून अनेक भागांत दमदार पावसाची नोंद झाली आहे. रविवारी पुणे, जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, सातारा या मध्य महाराष्ट्रातील ठिकाणी पाऊस पडला. कोकणातील मुंबई, सांताक्रूझ, रत्नागिरी, डहाणू येथेही जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणी परिसरात पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पाऊस बरसला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवरही मुसळधार पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यात काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे