भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; अर्धी पदे महिलांसाठी

भडगाव (प्रतिनिधी): भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण प्रक्रिया भडगाव येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. तहसीलदार रमेश देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर दुपारी ४ वाजता उपविभागीय अधिकारी, पाचोरा विभागाचे अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत घेण्यात आली.
यावेळी तहसीलदार रमेश देवकर, लिपिक महादू कोळी आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. मात्र, आरक्षण प्रक्रियेला नागरिकांची उपस्थिती अत्यल्प होती. आरक्षण सोडतीसाठी चिठ्ठ्या बालविकास शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी सिद्धेश्वर वाल्मीक पाटील यांच्या हस्ते काढण्यात आल्या.
भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी अर्धी, म्हणजे सुमारे २४ ग्रामपंचायतींची सरपंच पदे महिला उमेदवारांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. तसेच अनुसूचित जातींसाठी ६ ग्रामपंचायती राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यापैकी ३ ग्रामपंचायतींमध्ये महिला उमेदवारांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
यावेळी आरक्षण प्रक्रियेनंतर संबंधित गावांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले असून, निवडणुकीसाठी तयारी सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.