ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी “राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना”; अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी “राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना”; अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै

जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांसाठी “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना २०२५” राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ असून, अर्ज आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.

या योजनेसाठी साहित्य, लेखन, वाचन चळवळ, गायन, वादन, अभिनय, चित्रकला, नृत्य, प्रयोगात्मक कला अशा विविध क्षेत्रांतील ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे साहित्यिक व कलाकार पात्र आहेत. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे.

पात्रतेसाठी महत्त्वाच्या अटी:

अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.

कोणत्याही शासन सेवेत नोकरी करू नये.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे.

उपजीविकेचा मुख्य स्रोत केवळ कला किंवा साहित्य क्षेत्र असावा.

केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावा.

आवश्यक कागदपत्रे:

वयाचा दाखला,

आधार कार्ड,

रहिवासी प्रमाणपत्र,

उत्पन्नाचा दाखला,

प्रतिज्ञापत्र,

पासपोर्ट साईज फोटो,

बँक पासबुक,

अपंग दाखला (असल्यास),

राज्य/केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र (असल्यास),

नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारस पत्र,

विविध कलाकृतींचे पुरावे (छायाचित्रांसह).

अर्ज करण्याची प्रक्रिया:

कलावंत आणि साहित्यिकांनी ‘महा-ई-सेवा’ केंद्रामार्फत किंवा स्वतःच्या मोबाईलद्वारे महा सरकार पोर्टलवर User ID तयार करून अर्ज सादर करावा.

यासंदर्भात अधिक माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) भा.शि. अकलाडे यांनी दिली आहे. इच्छुकांनी अर्ज करण्यास विलंब करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.