अंधारात उभ्या मालवाहू वाहनाला धडक; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

अंधारात उभ्या मालवाहू वाहनाला धडक; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव | प्रतिनिधी

अंधारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला धडकून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना ११ मे रोजी रात्री कानळदा रोडवरील लक्ष्मी नगर परिसरात घडली होती. मृत व्यक्तीचे नाव शिवाजी लोभाजी दळवी (वय ५०, रा. तेजस पार्क, आव्हाणे शिवार) असे आहे.

शिवाजी दळवी हे एका खाजगी नोकरीवर असून, अपघाताच्या दिवशी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास ते (एमएच १९ बीएल ३३७३) क्रमांकाच्या दुचाकीवरून कामावरून घरी परतत होते. दरम्यान, लक्ष्मी नगरजवळ रस्त्यावर अंधारात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाची त्यांना चाहूल लागली नाही आणि त्यांच्या दुचाकीची त्या वाहनावर जोरदार धडक झाली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या दळवी यांना तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, १५ दिवसांनंतर सोमवार, २६ मे रोजी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मालवाहू वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.