चालकाच्या दुर्लक्षामुळे लक्झरी बसला भीषण आग
पहूर- जामनेर मार्गावरील पिंपळगाव गोलाईतजवळ घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

जामनेर | प्रतिनिधी
पहूर ते जामनेर रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर-धारणीकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसने चालकाच्या हलगर्जीपणामुळे अचानक पेट घेतला. ही घटना मंगळवार, २७ मे रोजी सकाळी सुमारास घडली. या दुर्घटनेत बस पूर्णतः जळून खाक झाली असून सुदैवाने ३० ते ३५ प्रवासी थोडक्यात बचावले.
झालेल्या माहितीनुसार, एमपी ४८ झेडएफ ५५३३ क्रमांकाची ही लक्झरी बस पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरमार्गे बुऱ्हाणपूर-धारणी (म.प्र.) कडे निघाली होती. बस पहूरहून जामनेरकडे जात असताना स्थानिक वाहनचालकांनी मागील टायरला आग लागल्याची सूचना चालकास दिली होती. काही तरुणांनी दुचाकीवर पाठलाग करत स्पष्टपणे आग लागल्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने हे सर्व इशारे दुर्लक्षित करत बस थांबवली नाही.
थोड्याच अंतरावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ अचानक आग भडकली. प्रवाशांनी आरडाओरड केली असता चालकाने बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना साहित्यासह सुरक्षित खाली उतरवले. त्या क्षणी आगीने संपूर्ण बसला वेढले होते. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
जोरदार वाऱ्यामुळे आग भडकली, बस खाक
दरम्यान, वारा जोरात असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. घटनास्थळी जामनेर नगरपालिकेचे आणि शेंदुर्णी येथील अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.