सीसीएमपीचा कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची होणार वैद्यक परिषदेच्या पुस्तकात नोंदणी

Relief for homeopathy doctors in the state ; Doctors who have completed the CCMP course will be registered in the Medical Council’s book सोलापूर (5 सप्टेंबर 2025) : सीसीएमपीचा कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची वैद्यक परिषदेच्या पुस्तकात नोंदणी होणार असून त्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले असून या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2014 पासून सुरू असलेल्या प्रक्रियेला अखेर अधिकृत मान्यता
राज्य शासनाने 2014 साली होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आधुनिक औषधशास्त्रावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजेच सीसीएमपी कोर्स सुरू केला होता. यामागचा उद्देश म्हणजे ग्रामीण व दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम करणे आहे. या कोर्ससंदर्भात सरकारने 30 जून 2025 रोजी आदेश काढून, कोर्स पूर्ण करणार्‍या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे करण्याचे निर्देश दिले होते.

आयएमने दाखल केली होती याचिका
सरकारच्या या निर्णयाला विरोध करत, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमने) पुणे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा नाकारत, राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला.

सरकारचा निर्णय
उच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता, राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने आज अधिकृत आदेश काढत, सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद चचउ च्या स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मध्यंतरी होमिओपॅथी डॉक्टर्स विरुद्ध ऍलोपॅथिक डॉक्टर्स असा संघर्ष ही बघायला मिळाला होता. आता सरकारच्या आदेशाने राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत अनेक होमिओपॅथी डॉक्टर्स संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

शेवटी सत्याचा विजय होतो : डॉ. बाहुबली शहा
होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा म्हणाले की, आज महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेत नोंदणी झालेल्या अधिकृत असणार्‍या सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांचे महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी करण्याबाबत 11 जुलै चे परिपत्रक मागे घेतले आहे. या डॉक्टरांचा महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नाव नोंदणीचा मार्ग मोकळा झालेला आहे. शेवटी सत्याचा विजय होतो, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.