टेस्लाची भारतात ‘एंट्री’ : मुंबईत सुरू झाले पहिले शोरूम !

मुंबई (प्रतिनिधी ) : एलॉन मस्कची मालकी असणाऱ्या टेस्ला कंपनीचे आज भारतात अधिकृतरित्या आगमन झाले असून देशातील पहिले शोरूम मुंबईत सुरू झाले आहे.

जगप्रसिद्ध टेक उद्योजक एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने अखेर भारतीय बाजारपेठेत आपली मॉडेल Y इलेक्ट्रिक SUV विक्रीस उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी (15 जुलै 2025) टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटवर या वाहनाच्या भारतातील किमती प्रसिद्ध करण्यात आल्या. मुंबईतील पहिलेवहिले शोरूम सुरू होण्यापूर्वीच टेस्लाने आपली विक्री मोहीम सुरु केली आहे.

टेस्लाची ही मोहीम अशा वेळी सुरू झाली आहे जेव्हा भारतातील रस्त्यांवर अजूनही डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर टेस्लाला भारतात जर्मन लक्झरी कंपन्या जसे BMW व Mercedes-Benz यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. तर टाटा मोटर्स व महिंद्रा ही स्थानिक उत्पादक कंपन्यांची उपस्थितीही महत्त्वाची आहे.

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी कार बाजारपेठ आहे. मात्र सध्या फक्त सुमारे 4 टक्के कार विक्री ही इलेक्ट्रिक वाहनांची आहे. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावामुळे अनेक संभाव्य ग्राहक अजूनही ईव्ही खरेदीपासून दूर आहेत.

मुंबईतील बीकेसी परिसरात उभारण्यात आलेल्या टेस्लाच्या पहिल्या शोरूमबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सफेद भिंतीवर ठळक काळ्या रंगात टेस्लाचा लोगो कोरलेला असून आत SUV कार काळ्या-राखाडी कव्हरने झाकलेली अवस्थेत काचेमधून दिसून येत होती. या संकुलात बाहेरील लोकांचा प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला होता, त्यामुळे फारच थोडेच चाहत्यांनी दर्शन घेतले.

एलोन मस्क यांनी अनेक वर्षांपासून भारतात टेस्ला आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. भारत सरकारने 2030 पर्यंत देशातील एकूण वाहन विक्रीपैकी 30% हिस्सा इलेक्ट्रिक व्हावा असा उद्देश ठेवला आहे. त्यामुळे सरकार परदेशी उत्पादकांना कर सवलतीसह काही स्थानिक उत्पादनाच्या अटींसह प्रोत्साहन देत आहे.

मात्र ही धोरणं एलोन मस्क यांच्यासाठी फार आकर्षक ठरली नाहीत. भारतात उत्पादन सुरू करण्याच्या अटी आणि करसवलती यावर अद्याप अंतिम निर्णय झालेले नाहीत. टेस्ला मॉडेल Y ची रिअर-व्हील ड्राईव्ह आवृत्ती ₹59.89 लाखांमध्ये तर लाँग रेंज रिअर-व्हील ड्राईव्ह आवृत्ती ₹67.89 लाखांमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. ही किंमत एक्स-शोरूम आहे.

टेस्लाने भारतात आपल्या मॉडेल Y विक्रीस सुरूवात करून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. परंतु किंमत, स्पर्धा आणि चार्जिंग सुविधांची मर्यादा पाहता, भारतातील ग्राहकांच्या प्रतिसादावरच टेस्लाच्या यशाचे भवितव्य अवलंबून असेल.