भाकरी फिरवली : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे

मुंबई – प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने आपल्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड केली आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. पाटील यांनीच शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यावर त्यास सर्वानी संमती दिली.

शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत आहेत. पक्षाच्या फुटीच्या काळातही त्यांनी निष्ठा कायम ठेवत पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. संघटनात्मक कार्यात त्यांचा मोठा अनुभव असून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात त्यांची मजबूत पकड आहे.

शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी असून ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. ते माथाडी कामगार चळवळीचे सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व मानले जातात. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला असून, समाजसेवा आणि राजकारणात लहानपणापासूनच त्यांना रुची होती.

1999 मध्ये त्यांनी जावळी विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. 2009 ते 2014 दरम्यान ते कोरेगाव मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांनी या निवडणुकीत ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता.

शिंदे दोन वेळा जावळी आणि दोन वेळा कोरेगाव मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. मात्र, 2019 मध्ये कोरेगावमधून शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती, परंतु त्यातही त्यांना यश मिळाले नाही.

सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे आमदार असून शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहत आहेत. आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याने पक्षसंघटनेच्या पुनर्बांधणीसाठी ते कसे नेतृत्व करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.