मुंबई- प्रतिनिधी | मुंबईच्या सांताक्रूझ येथे भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने एक विशेष सत्कार समारंभ पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि नुकतेच राज्यसभेत नियुक्त झालेले ॲड. उज्वल निकम यांचा या वेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात ॲड. उज्वल निकम यांनी आपल्या भाषणातून मनातील भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “निवडणुकीत मी हरलो खरा, पण माझा संकल्प विझलेला नव्हता. दुर्दैवाने काहींना हे समजले नाही.” पुढे बोलताना त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, त्यासाठी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने अफवांपासून सावध राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निकम म्हणाले की, “आज जिथे तिथे खोटी माहिती पसरवली जाते. लोकांची मते चुकीच्या पद्धतीने तयार केली जातात. भाषेच्या नावावर खोट्या कथा सांगितल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मलाही अशा अफवांचा सामना करावा लागला. काँग्रेसने मला देशद्रोही ठरवले, ही गोष्ट मला आजही सलते. देशविरोधात विचार करणारा मी नाहीच. त्या रात्री मला झोप लागली नव्हती. न्यायालयात जाऊन लढलो असतो, तर खोटे आरोप करणाऱ्यांनाच प्रसिद्धी मिळाली असती, म्हणून मी ते टाळले.” त्यांनी कार्यकर्त्यांना खोट्या प्रचाराला बळी न पडता एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.