Heavy rains in Maharashtra : Normal life disrupted मुंबई (16 सप्टेंबर 2025) : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदीनाले ओसंडले आहेत. पावसाने रस्ते व शहरांना जोडणारे पूल पाण्याखाली गेलेत त्यामुळे अनेक गावांचा शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे.

मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील शेतीचे या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा – नाना पटोले
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यात सतत सुरू असलेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. पावसामुळे उभी पिके, फळबागा व भाजीपाला पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.