जळगाव-प्रतिनिधी | भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी होंडा कंपनीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी ऍक्टिवा इलेक्ट्रिक आणि क्यूसी 1 या स्कूटर्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पदार्पण केलेल्या कंपनीने आता आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या होंडा शाइन बाईकचे इलेक्ट्रिक मॉडेल आणण्याची तयारी सुरू केली आहे.

गेल्या वर्षी मिलानमध्ये झालेल्या EICMA शोमध्ये होंडाने EV Fun नावाची कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक बाईक सादर केली होती. या मॉडेलवरून प्रेरणा घेत कंपनी या वर्षाअखेरीस नवे प्रॉडक्शन व्हर्जन बाजारात आणू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, ही कॉन्सेप्ट बाईक नव्या शाइन इलेक्ट्रिकपेक्षा काहीशी वेगळी असणार आहे.
नवीन पेटंट दस्तऐवजांनुसार होंडा शाइनची ही इलेक्ट्रिक बाईक सध्याच्या पेट्रोल मॉडेलच्या चेसिसवरच तयार केली जाणार आहे. त्यामुळे या बाईकचे डिझाइनही सध्याच्या शाइनसारखेच दिसण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे.
अधिकांश पार्ट्स सध्याच्या शाइन मॉडेलमधूनच घेतले जाणार आहेत. पेटंटनुसार या बाईकमध्ये कॉम्पॅक्ट मोटर असेल जी सिंगल-स्पीड रिडक्शन गियर ट्रान्समिशनला जोडली जाईल. ही मोटर सध्याच्या इंजिनच्या ब्रॅकेटवर बसवता येईल.
होंडा आपल्या इलेक्ट्रिक प्रॉडक्ट पोर्टफोलिओसोबतच भारतातील बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कलाही बळकट करत आहे. ऍक्टिवा ई सारख्या स्कूटर्समध्ये ही तंत्रज्ञान आधीपासूनच उपलब्ध आहे.
या नव्या शाइन इलेक्ट्रिक बाईकबाबत अधिक तपशील येत्या काही आठवड्यांत उघड होण्याची शक्यता आहे. भारतातील बाईकप्रेमींसाठी ही एक मोठी खुशखबर ठरणार आहे.