लातूर : विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी जाहीर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना थेट निवेदन दिलं आणि जोरदार घोषणाबाजी केली.

आज लातूरमध्ये सुनील तटकरे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. मेळावा संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. सभागृहात गेम खेळणाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत त्यांनी पत्ते देखील टेबलवर फेकले आणि “गेम खेळायचा असेल तर घरी खेळा” अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडलं.
यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली. छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. विजयकुमार घाडगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “आम्ही शांततेत निवेदन दिलं. त्यानंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून मारहाण केली. शेतकऱ्यांची मुलं छावामध्ये आहेत, याचा हिशोब लवकरच होईल.”
दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला रोखण्यात अपयश आलं. या प्रकरणामुळे लातूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.