लातूर– काल लातूरमध्ये मोठा राजकीय खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना झालेल्या मारहाणीमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही मारहाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने शहरात तणाव निर्माण झाला. रात्री उशिरा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर फाडत तीव्र निषेध नोंदवला.
या घटनेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. दमानिया म्हणाल्या, “कृषी मंत्री अधिवेशनात ऑनलाइन पत्ते खेळतात, त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारणे ही गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही.”
त्यांनी पुढे लिहिले, “सूरज चव्हाण म्हणतात की दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असंविधानिक भाषा वापरली म्हणून मारहाण केली. मग मारहाण करणे हे संविधानिक आहे का?” दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सूरज चव्हाण यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.