भुसावळमध्ये बनावट घरफोडीचा पर्दाफाश : जुगाराच्या नशेत महिलेने गमावले पैसे, पोलिसांनी उघड केला बनाव

भुसावळ (प्रतिनिधी) – जुगाराच्या व्यसनात बुडालेल्या भुसावळ येथील एका महिलेने कर्जाच्या ओझ्याखाली स्वतःच घरातील रोख रक्कम आणि दागिने गमावले. त्यानंतर घरफोडी झाल्याचा खोटा बनाव रचून पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) चाणाक्ष पथकाने सखोल तपास करत या बनावाचा पर्दाफाश केला. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खोट्या घरफोडीची तक्रार
१० जून रोजी भुसावळातील नॉर्थ कॉलनी परिसरात दुपारी घरफोडी झाल्याची तक्रार भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिने चोरल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. जळगाव एलसीबी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, काही संशयास्पद बाबी समोर आल्या. शेजारील घर १० दिवसांपासून बंद असताना तिथे कोणतीही चोरी झाली नव्हती, आणि तक्रारदाराच्या घराचे कुलूपही सुरक्षित होते.
जुगाराच्या व्यसनामुळे अनर्थ
एलसीबी पथकाने तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. यात तक्रारदाराची आई शर्मिला चंद्रमणी शिंदे (वय ४९, रा. आर.बी.-२/९५२, नॉर्थ कॉलनी, लिम्पस क्लब, भुसावळ) यांना जुगाराचे तीव्र व्यसन असल्याचे उघड झाले. त्यांनी घरातील रोख रक्कम आणि सावकाराकडून घेतलेले कर्ज जुगारात गमावले होते. जिंकण्याच्या लालसेपोटी त्यांनी स्वतःचे आणि मुलाचे सोन्याचे दागिने बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत तारण ठेवून गोल्ड लोन घेतले. हे कर्जही जुगारात खर्च झाल्याचे त्यांनी तपासात कबूल केले.
पोलिसांनी उघडकीस आणले पुरावे
पोलिसांनी बँकेकडून दागिन्यांच्या तारणाची पावती प्राप्त करून ही कथित घरफोडी बनावट असल्याचे सिद्ध केले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने या प्रकरणाची अचूक उकल केली. शर्मिला शिंदे यांना संशयित आरोपी म्हणून निष्पन्न करण्यात आले.
तपास यशस्वी करणारे पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात यशस्वी झाली. पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. संदीप चव्हाण आणि चा.पो.कॉ. महेश सोमवंशी यांचा सहभाग होता.