मोहन भागवत यांना अटक करण्याचा होता कट : माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

मुंबई – प्रतिनिधी । मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश होते, असा गौप्यस्फोट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या एका माजी इन्स्पेक्टरने केला आहे.

माजी अधिकारी महबूब मुजावर म्हणाले- भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी भागवतांना अटक करायची होती. त्यासाठी माझ्यावर मोठा दबाव टाकण्यात आला. माझ्याकडे या दाव्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. आता या प्रकरणातील सर्व सात आरोपी निर्दोष सुटलेत. यामुळे एटीएसचे बोगस काम उघड झाले. भगवा दहशतवाद नव्हता. सर्व काही बनावट होते. मी कुणाच्याही मागे गेलो नाही, कारण मला वास्तव माहिती होते. मोहन भागवत सारख्या व्यक्तीला पकडणे माझ्या क्षमतेबाहेर होते.

मुजावर पुढे म्हणाले, या निर्णयामुळे एका बोगस अधिकाऱ्याच्या बोगस तपासाचा पर्दाफाश झाला. एटीएसने त्यावेळी कोणती चौकशी केली आणि का केली हे मी सांगू शकत नाही, परंतु मला राम कलसांगरा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार व आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या सारख्या व्यक्तींविषयी काही गोपनीय आदेश देण्यात आले होते. हे सर्व आदेश असे नव्हते की कोणीही त्यांचे पालन करू शकेल.

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 100 जण जखमी झाले होते. सुमारे 17 वर्षांनंतर दिलेल्या निकालात न्यायाधीश ए.के. लाहोटी म्हणाले की, तपास यंत्रणा आरोप सिद्ध करू शकलेली नाही, त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा मिळावा.