धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू
नगरदेवळा – गाळण स्थानकादरम्यानची दुर्घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : नगरदेवळा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) शिवारात धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १४ जून रोजी मध्यरात्री घडली.
रेल्वे कि.मी. खांबा क्र. २५६/२२/२४ नजीक ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
मयताच्या जवळ मध्य प्रदेशातील एका जिल्हा रुग्णालयाचा केस पेपर मिळून आल्याने तो संबंधित राज्यातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निवृत्ती मोरे करत आहेत.