भोपाळ: सर्पदंशानं देशात वर्षाकाठी ५० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू होतो. विषारी सापांच्या दंशामुळे ग्रामीण भागात अनेकांचे मृत्यू होतात. यातील बहुतांश मृत्यू वेळेत उपचार न मिळाल्यानं होतात. पण मध्य प्रदेशात एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. विषारी सापानं एका २५ वर्षीय तरुणाला दंश केला. त्यामुळे तरुण घाबरला. पण पुढच्या ५ मिनिटांत विषारी सापाचा तडफडून शेवट झाला. या घटनेची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरु आहे. सर्पदंश झालेल्या तरुणावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात २५ वर्षांचा सचिन नागपुरे राहतो. तो पेशानं कार मॅकेनिक आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता तो स्वत:च्या शेतात गेला होता. तेव्हा त्याचा पाय चुकून सापावर पडला. त्यानंतर ५ मिनिटांनी सापाचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेनं सर्पतज्ज्ञ आणि डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण अशा प्रकारच्या घटना अतिशय क्वचित घडतात.सर्पदंशानंतर सचिनवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत आता चांगली आहे. ‘गेल्या सात ते आठ वर्षांपासून मी आंबा, जांभूळ, कडुलिंबाच्या झाडांचा वापर दंतमंजन म्हणून करतो. याच जडीबुटीच्या लाकडांच्या मिश्रणामुळे माझं रक्त सापासाठी विषारी ठरलं असावं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा,’ असा अंदाज सचिन नागपुरेनं वर्तवला.
