जिल्ह्यात धरणसाठ्यात वाढ; गिरणा, वाघूर, हतनूरमध्ये चांगला जलसाठा, काही प्रकल्प मात्र कोरडेच

जिल्ह्यात धरणसाठ्यात वाढ; गिरणा, वाघूर, हतनूरमध्ये चांगला जलसाठा, काही प्रकल्प मात्र कोरडेच

जळगाव – जून महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख धरणांमध्ये चांगला जलसाठा झाला आहे. गिरणा, वाघूर आणि हतनूर धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठल्यामुळे खरीप हंगामासाठी दिलासा मिळाला आहे. मात्र काही भागांमध्ये पाऊस कमी पडल्याने काही धरणांमध्ये अजूनही पाणी शून्यावर आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये फक्त ११ टक्क्यांवर असलेले गिरणा धरण यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे गिरणा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या भागात खरिपासोबत रब्बी हंगामही यशस्वी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, हतनूर धरणातही पाण्याची पातळी चांगली वाढली असून, सध्या धरणातील जलाशय २१०.४२० मीटरपर्यंत भरले आहे. धरणातून ६० क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरळीत सुरू असून, अर्धा मीटरने गेट उघडण्यात आले आहेत. वाघूर धरणातही साठा चांगला असून, पाणीपुरवठ्यास अडचण येणार नाही, असे संकेत आहेत.

धरण साठ्याचा टक्का पाहता सुकी धरण सर्वाधिक ९२ टक्के भरले आहे, तर वाघूर ६४ टक्के आणि हतनूर ३० टक्क्यांवर आहे. अंजनी, गुळ, मोर यामध्येही समाधानकारक साठा झाला आहे.

मात्र, जिल्ह्यातील अग्नावती, भोकरबारी आणि बोरी हे मध्यम प्रकल्प मात्र अद्याप कोरडेच आहेत. या भागात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

एकूणच जिल्ह्याच्या बहुतांश भागात धरणसाठ्यात चांगली वाढ झाली असून, खरीप हंगामाला सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागांत मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.